हुंकार

हुंकार

                 -व.पु.काळे

 

             वपु ! मराठी वाचन संस्कृतीतील क्वचितच लोक असतील ज्यांना हे नाव माहित नाही. हुंकार हा कथासंग्रह मी वाचलेलं वपुचं तिसरं पुस्तक ! वपुंच्या व्यक्तीमत्तवाचे अनेक पैलु आपल्याला दिसतात एक उत्कृष्ट कथाकार , तत्तवज्ञ , विचारवंत हे त्यातीलच काही. असो वपुंसारख्या सागराचं वर्णन मी काय करावं तर मी येतो मुद्द्यावर अर्थात हुंकारवर !

              वपुंच्या कथा कधी वाचकाला हसवतात कधी रडवतात तर कधी वाचकांशी तासनतास नुसतं हितगुज करतात, बोलत राहतात. प्रत्येक कथा वाचल्यानंतर विचार केला नाही तर कथा समजणे आणि त्यातील संदेश घेणे थोडं अवघडच ! मी हुंकार हा कथासंग्रह चार दिवसापूर्वीच वाचून वेगळा केला. काय तो अनुभव ! एक वेगळचं जग वपुंच्या कथांमधून अनुभवायला मिळतं. 17 कथांचा हा संग्रह आपल्या प्रत्येक कथेत काहीतरी वेगळेपणा देऊन जातो.
यातील पहिलीच कथा हुंकार. ही कथा म्हणजे पुढच्या मेजवानीचे ट्रेलर म्हणायला हरकत नाही. लग्नाआधीचं प्रेम आपल्याला परत भेटतं त्या प्रसंगाची ही गोष्ट. यातील एक वाक्य मला फार आवडतं "सुगंधात आणि स्वप्नात फार साम्य आहे दोघांचीही शेवटी राख होते " त्यानंतरची कथा "चक्रम" थोडी मजेशीर थोडी विचार करायला लावणारी ही कथा. हुंकारमध्ये फक्त वैचिरिक किंवा प्रासंगीक कथा आहेत असचं नाही बरं ! विचारांमार्फत विनोद पोहचवून आपल्याला हसवणं हेच वपुचं मोठं कौशल्य. संग्रहातील "मांजर" आणि "बुमरँग" या कथा वाचल्यावर याची अनुभुतीही आपल्याला येतेच.

             "शिकार" ही कथा प्रेमयुगल आपल्या लग्नासाठी काय काय शक्कल चढवतात ते दिसते आणि त्याचा जो मजेशीर शेवट होतो तो मात्र वाखाणण्याजोगा आहे. पण त्याच पुढील "पोरकी" ही कथा मात्र डोळ्यात पाणी आणते. मन अधिक संवेदनशील होतं आणि तो प्रसंग आपल्याच डोळ्यांसमोर उभा राहतो. तरुणांसाठी संपूर्ण कथासंग्रहच खूप मार्गदर्शक ठरतो पण यातील "सोनाराने कान टोचले दुसर्‍यांदा" आणि "निर्णय" या दोन्ही कथा आपल्या तरुण वयातील अनेक चूका आणि नैतिकता याबद्दल उपदेश करतात.

          "हाॅलिडे स्पेशल" ही कथा मला विशेष आवडते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही एक प्रेमकथा वाटते आणि शेवटी कथा अशी काही कलाटणी घेते की वाचक हसल्यावाचून राहात नाही. "कैफियत" आणि "रिकामी खुर्ची" या कथा मात्र आपल्याला फार विचार करायला लावतात.

           हे झालं कथांबद्दल माझं मत पण या कथांमधून घेण्यासारखं भरपूर आहे जे इथं सांगणं म्हणजे हुंकारचा एक वाचक कमी करण्यासारखं होईल. तेव्हा हुंकार तुम्हीही वाचा मला ज्या गोष्टी कळाल्या त्यापेक्षा काही वेगळ्या तुम्हाला कळु शकतात. त्या तुम्ही मला सांगु शकता कारण आपल्याला ही वाचनसंस्कृती पुढे चालवायचीये !😊😊

©️®️Parth Bhendekar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

बाई, बायको, कॅलेंडर !

पहिले प्रेम