दोन मने

 दोन मने  

                                      -वि.स.खांडेकर


जीवन ही लढाई आहे.

जीवन हा यज्ञ आहे.

जीवन हा सागर आहे.

जखमांवाचून लढाई नाही.

ज्वालेवाचून यज्ञ नाही.

वादळावाचून सागर नाही.


             खांडेकरांच्या दोन मनेमधील हे वाक्य डोक्यात सतत गिरट्या घालत आहे....नव्हे नव्हे संपूर्ण कादंबरीच डोक्यामध्ये थैमान घालत आहे. त्यामुळे कादंबरीतील प्रत्येक पात्र बाळासाहेब, चपला, आगटे, श्री सगळीच कादंबरी वाचतानाही आणि वाचून संपल्यानंतरही आपलीच वाटत आहेत.

            दोन मने हे नाव वाचताच मनात ही मानवी भावनांच्या किंवा मानसशास्त्राच्या धरतीवर लिहिलेली एक कादंबरी असावी असे वाटले होते परंतू जसे जसे कादंबरी वाचत गेले तसे तसे त्यातील सामाजिक बाजूचे दर्शन घडत गेले. विसाव्या शतकातील अस्पृश्यता, दलितांचे होणारे हाल आणि त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तरुण श्रीची चालू असलेली धडपड हे सर्व पाहून आपण ही परिस्थिती आपल्या डोळ्यांनी पाहतोय असा नेहमी भास होत राहतो. 

             कादंबरीतीला पात्र आपली वाटतात कारण ती चूकतात ! पण जेव्हा आपण त्यांच्यावरती ओढावलेल्या परिस्थितीचा घेतो तेव्हा मात्र ती अपराधाएवढी चूकसुद्धा चूक वाटत नाही. यावरुन एक गोष्ट समजली की जर आपल्या एखाद्या चूकलेल्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली किंवा त्याच्या परिस्थितीचा विचार केला तर कदाचित आपली बरीच मौल्यवान नाती तुटली नसती दुरावली नसती. असो आपणही माणूसच ना आपणही चूकतो ! 

            कादंबरीतीला सामाजिक वास्तवासोबतच पात्रांमध्ये असलेला भावनांचा ओलावा, त्यांचा आयुष्यासोबत असलेला प्रामाणिक दृष्टीकोन आणि दोन मने यासारखी आगळी वेगळी संकल्पना यामुळे कादंबरी एका वेगळ्याच उंचीवर पोहचते. पण मला कादंबरीचा शेवट मात्र प्रचंड आवडला. एकमेकांपासून पार वेगळे असलेले तीन प्रवाह हे एकमेकांचे एवढे जवळचे नातलग असतील असं कादंबरी वाचताना एकदाही वाटलं नाही त्यामुळे शेवटी कथेला मिळालेली ही कलाटणी नकळत चेहर्‍यावर हसु आणत होती. कादंबरी पात्र, त्यांच्या कथा आणि त्यांचे पुर्वआयुष्य हे सर्व अगदी सुव्यवस्थितपणे उलगडत जाते त्यामुळे त्या वाचकाला अगदी धरून ठेवते स्वतःपाशीच ! 

                "माणसाला दोन मनं असतात, बाळासाहेब एक पशुचं आणि दुसरं देवाचं ! पहिलं मन उपभोगात रमतं तर दुसरं त्यागात !" आगटेंचं हे वाक्य किती सहजपणे जगाचं वास्तव दाखवतं. ज्याचं पहिलं मन अधिक जागृत त्याचा श्वापद होतो आणि ज्याचे दुसरे मन अधिक जागृत त्याला देवपण बहाल केलं जातं ! पण माणूस म्हणून जगण्यासाठी या दोन्ही मनाचं सुंदर मिलन घडवून आणत त्यांचा तोल सांभाळणं फार महत्तवाचं आहे हे कादंबरी शिकवते. कारण मनुष्य केवळ उपभोगाचा पुतळा नाही, तशी ती त्यागाची आदर्श प्रतिमाही नाही. या दोन्हींचा तोल सांभाळता ज्याला आला त्याला खर्‍या अर्थाने जगता येतं !


              अद्भूत कथा, नाजूक विषय आणि आपुलकीची पात्र यांसोबत अनेक अनुभवांची शिदोरी देणारी दोन मने ही रोमांचकारी सफर आहे तेव्हा ही सफर चूकवू नका !😁


              मग कधी वाचताय दोन मने ? किंवा कधी वाचलीये तेसुद्धा कळवा😃


©️®️पार्थ भेंडेकर

]

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

रावण राजा राक्षसांचा

पहिले प्रेम