मन मै है विश्वास

मन मै है विश्वास

                            - विश्वास नांंगरे पाटील

 

 चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं एकदा वाचून भागत नाही तर ती वारंवार वाचावी लागतात. असचं एक नातं आपलं बर्‍याच पुस्तकांसोबतही असतं ! अश्याच काही माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकांच्या यादीमध्ये मी मन मै है विश्वास या पुस्तकाचे नाव नमुद करेल. दोन वेळा वाचून झाल्यानंतरही तिसर्‍यांदा वाचताना मला हे पुस्तक भरपूर काही देऊन गेले. खूप प्रेरणा, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, परिस्थितीवर मात करत सामर्थ्य प्राप्त करता येते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे 'मन मै है विश्वास' हे पुस्तक होय. हे पुस्तक वाचल्यानंतर मला या पुस्तकाचे लेखक पोलीस अधिक्षक (IPS) विश्वास नांगरे पाटील सरांना 3 इडियट्स मधला एकच dialogue म्हणून धन्यवाद म्हणावेसे वाटते. आणि तो dialogue म्हणजे "जहापनाँ तुसी ग्रेट हो !" काय लेखक कौशल्य आहे राव या माणसाचं ! हे तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर कळेलच !

            जर या पुस्तकाचा सारांश द्यायचा झाला तर संस्कृतमधील एकच ओळ पुरेशी आहे. 'तमसो मा ज्योर्तीगमय' म्हणजेच अंधाराकडून उजेडाकडे नेणारे हे पुस्तक आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील एका लहानश्या गावात जन्मलेला एका फाटक्या चड्डीतील मुलगा ते मुंबईत राहणारे सुटाबुटातले IPS अधिकारी असा हा सुंदर प्रेरणादायी प्रवास वाचताना तुम्ही अनेक भावनांचा मनसोक्त अस्वाद घ्याल, कधी भावूक व्हाल, कधी हसालही ! लेखक व IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे हे आत्मचरित्र वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील नकारात्मक विचारांना विसरुन जाल. त्यांचा संपूर्ण प्रवास हा गरिब परिस्थीती ही कधीच आपल्या यशाच्या आड येत नाही हे खरोखर दाखवून देणारा आहे. पण हे पुस्तक इथेच थांबत नाही. UPSC ची स्पर्धा परिक्षा देणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला हे पुस्तक देणगीच म्हणावी लागेल. अभ्यास कसा करावा, कोणता करावा, कशाप्रकारे करावा, नेमकी पद्धत कशी असावी याचे चोख मार्गदर्शन सरांनी केलेले आहे मी तर म्हणतो प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. कुठल्या परिक्षेचा अभ्यास करताना अभ्यासाबरोबरच सातत्य, जिद्द, चिकाटी , धैर्य , सकारात्मक मनोबल असावे लागते. अपयश आले तर न खचता न डगमगता कसे पुन्हा उभे राहावे याच्यावरही या पुस्तकामध्ये विचारविमर्श केलेला आहे.

         लेखक विश्वास नांगरे पाटील सरांनी या सगळ्या बरोबरच 26/11 च्या काळरात्रीतील अनेक किस्से सांगीतले आहेत जे वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणींबरोबरचे, काॅलेज व शाळेमधील अनेक प्रसंग आपल्याला आपल्या आयुष्याशीसुद्धा अगदी सहजरित्या जुळवून घेता येतात. प्रत्येक प्रसंग आपल्यासमोर असा उभा केला जातो की वाचताना आपण त्यात अक्षरशः हरवून जातो ज्यावरुन लेखकांच्या लिखाणाचे कसब दिसून येते. अनेक ठिकाणी काव्यपंक्तींचाही आधार घेतलेला तुम्हाला आढळेल.

           शेवटी एवढेच म्हणेल की ज्याला कोणाला आयुष्यात हरवल्यासारखे जीवनाला दिशा नसल्यासारखे काहीही प्रेरणा नसल्यासारखे वाटत असेल त्यांनी हे पुस्तक एकदा जरुर वाचावे तसंही आता मन मै है विश्वास या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती पण 'Head held high' या नावाने प्रकाशीत झालेली आहे. त्यामुळे तुमौहाला ज्या भाषेमध्ये सोयीचे पडेल त्या भाषेत एकदा तरी नक्की वाचा....मन मै है विश्वास !

©️सौरभ बाभुळकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

रावण राजा राक्षसांचा

पहिले प्रेम