बकुळा

बकुळा

 

 बकुळा....पुस्तक हातात पडलं आणि मुखपृष्टावरचं वाक्य वाचलं, 'श्रीमती आणि श्रीकांतच्या प्रेमाची साक्ष - बकुळा ' आता हे वाक्य वाचल्यानंतर कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाने मला कादंबरी एक प्रेमकथा आहे असचं वाटलं जी ती आहेसुद्धा ; पण ह्या कादंबरीला फक्त प्रेमकथा मी मुळीच म्हणणार नाही कारण ही मानवी वृत्तीचं एक वास्तवदर्शी दर्शन आहे.
      कादंबरीमध्ये अर्थातच श्रीमती आणि श्रीकांत हे दोन मुख्य पात्र आहेत. ज्यांच्यातील प्रेम, स्नेह आपल्याला त्यांच्या बालपणीपासून वाचावयास मिळाल्याने आपण या दोघांशीही बर्‍याच प्रमाणात स्वतःला जोडून घेतो. काही किस्से तर एवढे जवळचे वाटतील की श्रीकांत-श्रीमती विसरुन तुम्हाला शाळेतला एखादा किस्सा नाही आठवला तर नवल ! सोबतच कादंबरीमध्ये रेखाटलेली इतर पात्रसुद्धा आपल्याला आपल्यातीलच वाटतात, यामागील कारण आहे पात्रांचा अगदी सुयोग्यपणे रेखाटलेला स्वभाव !
      दोघांच्या बालपणातील प्रेमाचे किस्से आणि त्यांच्यातील किंवा मुला मुलींच्या गटातील कळत -नकळत चालु असलेली स्पर्धा पाहून तितकचं भारी वाटतं जितकं जुन्या मित्रांसोबत बसून जुन्या आठवणी ताज्या करताना वाटतं.
      आता श्रीमती आणि श्रीकांतचं लग्न होईपर्यंत तर सर्वकाही छान चालू असतं पण त्यानंतर आपण श्रीकांतचं असं रुप पाहतो जे कदाचित आपल्याला कधीही व्हावसं वाटणार नाही. एक सतत कामामध्ये व्यस्त असलेली व्यक्ती व्यक्तीगत आयुष्यामध्ये प्रचंड यश प्राप्त करुन त्या धुंदीत आपल्यावर जीव ओवाळून टाकणार्‍या, सतत सहकार्य करणार्‍या पत्नीचं प्रेम नाही पाहु शकत हे वाचताना यशाच्या मागे पळताना आपल्यांचा विसर पडु देऊ नये या शिकवणीचा वारंवार पाढा डोक्यात चालु होता. जो खरंतर या पुस्तकातून मी घेतलेला सर्वात महत्तवाचा धडा आहे असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही.
      आपण आयुष्यात यश, पैसा, प्रसिद्धी या गोष्टींमागे पळताना एवढे हरवून जातो की या जगात आपली काळजी करणारी आपल्याकडे फक्त वेळ मागणारी काही माणसं आहेत हेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही...आपण फक्त एक मशिन बनून राहतो. निश्चितच या सर्व गोष्टीसुद्धा जीवनात महत्तवाच्या आहेतच पण त्यांना मिळवण्याच्या प्रयत्नात आपण जगणं विसरत असु, आपल्या माणसांना प्रेम देणं विसरत असु तर मात्र सर्व जगतातील सुख आपल्या चरणांशी असुन ते आपल्याला उपभोगता येणार नाही हे गोष्ट आपल्याला पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवते.
      सोबतच श्रीमतीच्या पात्राने प्रेमासाठी केलेला त्याग आपल्याला प्रेमाची खरी व्याख्या देणारा वाटेल किंवा तिने केलेली सर्वात मोठी चूक वाटेल हे तर आपण पुस्तक वाचताना स्वतःच ठरवालचं पण श्रीमतीची परिस्थिती, तिने श्रीकांतसाठी केलेला त्याग आणि श्रीकांतच्या पात्राला पाहून आपण आपल्या यशाइतकचं जवळच्या माणसांवरही प्रेम करायला भाग पाडेल व या धावपळीच्या जगण्यामध्ये आपल्या माणसांचं महत्तव सांगेल हे ठामपणे सांगु शकतो.
      कांदबरी का वाचावी याचं एक कारण मी देण्याचा प्रयत्न केलाय...इतरही भरपूर कारण आहेत जे कदाचित मला दिसले नाही पण तुम्हाला नक्कीच दिसतील तेव्हा कादंबरी नक्की वाचा एवढचं म्हणेन !

©️पार्थ भेंडेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

बाई, बायको, कॅलेंडर !

पहिले प्रेम