रारंगढांग

 रारंगढांग

                                                                         - प्रभाकर पेंढारकर


         पांढराशुभ्र हिमालय ताठ मानेने अनेक वर्ष उभा आहे. काश्मिरी भागात उंच खडे कडे आणि त्यांच्या एका बाजूला खोल दरीत फेसाळणारी सतलज इथल्या गोर्‍यागोमट्या माणसांचं आयुष्य खरंतर अगदीच सामान्य ; पण स्वैर अशा निसर्गामुळे असामान्य बनतं, अशा ठिकाणी रस्ते बांधायचे म्हणजे मोठ जोखमीचं काम आणि म्हणूनच तिथे सैन्याची शिस्त महत्त्वाची! छोट्यात छोटी गोष्टसुद्धा नियमात बसूनच व्हावी हा यांचा बाणा. त्यातच तिथे ले. विश्वनाथ मेहेंदळे येतो आणि कथा सुरू होते.

     अतिशय स्थिर, शांत, नव्या व उमद्या विचारांचा विश्वनाथ स्वतंत्रपणे काम करावे म्हणून पदोपदी आर्मीच्या शिस्तीला आव्हान देतो. त्याची नेमणूक रारंगढांगातून जाणाऱ्या रस्त्यावर होते. या बांधकामामध्ये असलेला धोका वरिष्ठयांच्या नजरेसमोर आणतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं. आणि मग जे व्हायचं तेच होते - अपघात ! आणि त्या अपघातामुळे सात जीव निष्प्राण होतात. तेव्हा त्यांच्या नावाचे सात आणि जास्तीचा खांब विश्वनाथ परस्पर बांधून टाकतो. हे बेकायदेशीर असूनही अनेक लोक त्याला साथ देतात आणि विश्वनाथवर कोर्ट मार्शल होते.

        मग पुढे नेमक काय होते? आणि विश्वनाथ असं मुळात का करतो, त्यावर त्याचं स्पष्टीकरण काय असतं? याची उत्तरं पुस्तकात सापडतात.

         पुस्तकातली सर्वात जमेची बाजू म्हणजे कथानकाची मांडणी ! अगदी चित्रपटाप्रमाणे काही प्रसंग मुद्दाम समांतर आहेत. उदा. सर्जेराव जातो त्याच रात्री त्याच्या लग्नासाठी अहिर, कुंकवाचा करंडा पोहोचवल्याचं उमेचं पत्र येत. हे सगळं खूप सुंदरपणे कसलीही प्रस्तावना न मांडता, थेट एकामागून एक दिलं आहे. त्यामुळेच ते जास्त प्रभावी ठरतं.

            बाकी मेजर बंबा आणि मिनू खंबाटा ही दोन्ही पात्रं लक्षात राहतात व आपलीच होऊन जातात. एकूणच पुस्तक सर्वपक्षी उत्तम आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही !

-स्वामिनी हर्षे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

The Power of Your Subconscious Mind

The diary of a young girl

पहिले प्रेम