बाई, बायको, कॅलेंडर !

बाई, बायको, कॅलेंडर !

                         - व.पु.काळे

 1 कथासंग्रह 15 कथा...वेगवेगळा आशय-विषय आणि वेगवेगळ्या मानवी भावनांवर प्रकाश टाकणारी कथांची मांडणी म्हणजे एकूण बाई, बायको, कॅलेंडर हा वपुंचा कथासंग्रह !

 पुस्तकचं मुखपृष्ट आणि शीर्षक पाहिल्यावर लगेचचं विनोदी कथासंग्रह आहे याचा अंदाज आला आणि पुस्तक घेतलं आणि वाचायला लागलो ! वपु म्हणलं की रोजच्या दैनंदिन जीवनाचं तत्वज्ञान उलगडणारे लेखक हे आतापर्यंतच्या वाचनातून माझा झालेला समज पण जीवनाकडे इतक्या बारकाईने पाहणारे निरिक्षण करणारे वपु आपल्या आजुबाजूच्याच लहान-सहान गोष्टींवरुनही कश्याप्रकारे विनोद शोधून आपल्यासमोर मांडतात हे पाहणं म्हणजे या पुस्तकाचं मुख्य आकर्षण आणि ओळखही !

 कथासंग्रहातल्या सर्वच कथा एका वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन आपल्यासमोर येतात मग कधी तो कॅलेंडरमधून जिंवत होणार्‍या बाईमुळे निर्माण झालेल्या फजितीचा असेल तर कधी टाईट पँटमुळे घडलेल्या गोंधळाचा असेल पण त्या विषयांमधील आणि कथांमधिल एक साम्य म्हणजे प्रत्येकचं कथा वाचकाला खळखळून हसवते ! 'हेअरस्टाइल', 'पेन सलामत तो-' किंवा स्टॅटिस्टिक्स सुदर्शनची 'नऊवारी-सातवारी-पाचवारी- टक्केवारी' ही कथा असो व्यक्तींच्या स्वभाववैशिष्टांमुळे ज्याप्रकारे लेखक विनोद निर्माण करतात ते खरचं वाखाणण्याजोगं आहे ! स्वभाववैशिष्टांसोबतच मित्रांचा कळप सबत असेल तेव्हा त्यांनी केलेल्या उचापात्या जेव्हा आंगलट आलेल्या आपण 'पैज+धाडस=ब्याद' आणि 'दात है तो बात है' या कथांमधून वाचतो तेव्हा आपल्या मित्रांच्या कळपाची आठवण आल्यावाचून राहत नाही !

 विनोदी कथांसोबतच 'मीच तुमची वहिदा' आणि 'प्रिमियर' या कथा नात्यांमधील विशेषतः नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा, प्रेम यांचा फार जवळून अनुभव करवून देतात.

 थोडक्यात काय तर नेहमीच्या कादंबर्‍यांच्या आणि वैचारिक लिखाणाच्या वाचनातून थोडी सुट घेऊन काहीतरी हलकंफुलकं, मन फुलवणारं, हसवणारं काही वाचायचं असेल तर त्याने बाई, बायको, कॅलेंडर हा कथासंग्रह नक्की वाचावा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

The Power of Your Subconscious Mind

The diary of a young girl

पहिले प्रेम