रावण राजा राक्षसांचा


रावण राजा राक्षसांचा

लेखक - शरद तांदळे

कोणत्याही कथेचा नायक किती महान आहे हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या खलनायकाच्या सामर्थ्याची कल्पना असणं गरजेचं असतं त्यामुळे प्रभू रामाची महानता आणखी चांगली समजून घेण्यासाठी आपल्याला रावणसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. इतिहास लिहितानासुद्धा जिंकलेल्या बाजूसोबत हरलेल्या बाजूचा इतिहास सुद्धा लिहिला गेला पाहिजे. रावण : राजा राक्षसांचा ही शरद तांदळे सरांची कादंबरी अश्याच प्रकारे रावणाच्या जीवनाला न्याय देण्याची यशस्वी प्रयत्न करते आणि या यशाचे आपण सर्वजण वाचक साक्षीदार आहोतचं !


आजपासून दोन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा रावण वाचलेला तेव्हा यावर लिहिण्याचा योग आला नाही पण आज परत एकदा रावण कादंबरी वाचून संपवली आणि पुस्तकाबद्दल लिहायला बसलो. विश्रवाच्या आश्रमामध्ये जन्म झालेल्या दशाग्रीव या संकरीत (आर्य-अनार्य दोघांपासून झालेल्या) मुलाचा राक्षसांचा सम्राट 'रावण' बनण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे रावण ही कादंबरी. 


कादंबरीच्या सुरुवातीपासूनच लेखक पूर्णपणे आपल्याला दशाग्रीवाच्या जीवनाशी जोडतात आणि आपण त्याच्या सोबत त्याच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास करु लागतो. रावणाची वंशावळ, ज्ञानार्जन, शौर्य, क्रुरता, शासन यासारख्या सर्वच महत्तवाच्या घटकांना कादंबरी फार जवळून स्पर्श करते. रावणावरती लिहिलेली कादंबरी म्हणल्यावर त्याच्याकडे बर्‍याच अंशी झुकलेली असेल असा आपला समज होऊ शकतो पण लेखक मात्र रावणांचा चुकांना, अपराधांनासुद्धा उघडपणे वाचकांसमोर मांडतात त्यामुळेचं कादंबरी वाचताना कुठेही रावण आपल्या मनावर बिंबवला जातोय असं न वाटता रावण चांगला, वाईट की आपल्या सर्वांसारखा एक Gray Character म्हणून समजून घ्यायचा हे लेखक पूर्णपणे आपल्यावरती सोडतात. यामुळेच कादंबरीचं महत्तव सुद्धा आपोआप वाढतं. 


रावणाची महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांचा चढता तक्ता जसा आपण या प्रवासात अनुभवतो त्याप्रमाणेच त्याच्या सामर्थ्याला त्या शेवटच्या काळात लागलेले उतरती कळा सुद्धा आपण पाहतो तेव्हा मात्र बुद्धीबळ, रुद्रवीणा यांची निर्मिती करणारा शिवतांडवस्तोत्र लिहिणारा रावणसुद्धा आपल्यासारखा माणूस होता यावर आपला विश्वास बसतो. केवळ रावणाबद्दलचं नाही तर इतरही सर्व पात्राच्या आयुष्यातील चमत्कारिकता बाजूला सारून केलेलं त्याचं वर्णन मला एक इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने खूप जास्त भावलं. 


बाकी रावण शत्रू जरी असला तरी त्याच्याकडून शास्त्र समजून घ्यावं अशी आज्ञा स्वतः रामाने लक्ष्मणाला केलेली आपल्या सर्वांना माहित आहेचं त्यामुळे सर्वांनाच रावणाच्या आयुष्यातून बरंचकाही शिकण्यासारखं आहे यामध्ये काहीही वाद नाही. त्यामुळे सर्वांना हे पुस्तक वाचावं हा आग्रह आणि एकदा वाचलेल्यांना परत एकदा वाचावं ही इच्छा कारण माझ्या पहिल्या वेळेपेक्षा यावेळी पुस्तकातील बारकावे जास्त लक्षात आले.


शेवटी तांदळे सरांच्या आगामी बळी कादंबरीची आतुरता आहेचं....त्यांना मनापासून शुभेच्छा


- पार्थ भेंडेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

पहिले प्रेम