उल्का

 उल्का

                                                                         -वि.स.खांडेकर


एक स्त्रीप्रधान कथा, स्वातंत्र्यपुर्व काळातील सामाजिक परिस्थिती आणि समाजातील गरिब-श्रीमंत दरी या सर्वांचं वास्तववादी आणि रोमांचक चित्रण करणारी कादंबरी म्हणजे खांडेकरांची उल्का !

खांडेकरांच्या मते ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. खांडेकरांची डोळ्यांसमोर प्रसंगाचे चित्र उभे करण्याचे कसब उल्केमध्येसुद्धा आपल्याला अगदी पुरेपुर दिसून येते. उल्का ही एका तत्वनिष्ट शिक्षकाची तत्वनिष्ट मुलगी. लहानपणीपासूनच समाजाला प्रश्न करणार्‍या उल्केमध्ये मला विद्रोह कादंबरीमधील बर्‍यात प्रसंगांमध्ये अगदी ठासुन भरला असल्याचे ठळक दिसले. उल्केचे बालपण त्यात इंदु ,निरा या पात्रांद्वारे समाजातील तीन वेगवेगळ्या चित्रांचे चित्रण या गोष्टी सहज जाणवून येत नसल्या तर वाचताना आपल्या मनावरती प्रभाव पाडत त्या काळची चिंताजनक परिस्थिती आपल्याला दाखवून देतात.

आई मुलांवरती संस्कार करणार आणि वडिल फक्त आर्थिक आधार देणार हे बर्‍यात कादंबर्‍यांमधील बिंब खांडेकर मात्र उलथून टाकतात. उल्काच्या बालवयात आणि तरुणवयात भाऊंनी अर्थात तिच्या वडिलांनी तिच्यावरती केलेले संस्कार  तिला तिच्या भावी आयुष्यात कित्येक वेळी उपयोगी पडतात. हे संस्कार आपण आपल्या आयुष्यातसुद्धा लागु करुन घेतले तर नक्कीच आपल्या आयुष्यात भरपूर चांगले बदल घडतील त्यामुळे भाऊ आणि उल्का यांच्या नातेसंबधांवर कादंबरी वाचताना जास्त लक्ष द्यावे असे मी आर्वजून सांगेल.

तरुण वयात उल्केच्या मनावर प्रेमाचा झालेला अंमल, एक नव्हे तर दोन वेळा ठरलेलं लग्न केवळ पैशाच्या हव्यासापोटी वरपक्षाकडून मोडलं जातं यासारखं भावनिक वादळ आयुष्यात चालु असताना चंद्रकांत आणि त्याचे पत्र तिला जगण्याची नवी आशा व संघर्षाची नवी व्याख्या देऊ करतात. चंद्रकांतची तत्वनिष्टता, त्याची बैद्धिक प्रगल्भता या सर्व गोष्टी तिला नेहमी विचार करायला भाग पाडतात.

लग्नाचं हे सर्व नाट्य तेव्हा संपत जेव्हा उल्केचं लग्न एका व्यापार्‍यासोबत होतं. या मधल्या काळात तिच्या आणि नवर्‍याच्या नात्यामधील कृत्रिमता तिच्यातील एक संवेदनशील मुलगी संपवत जाते. तेव्हा चंद्रकांत तिला तिच्याचच आधीच्या रुपाचा पुन्हा एकदा परिचय करुन देतो आणि सुखामध्ये लोळन घेणारी उल्का बंड करत इंग्रजांविरुद्धच्या आंदोलनात उतरुन तुरुंगात जाते. इथपासून तिचे आणि तिच्या नवर्‍याचे नातं बिघडण्यास सुरुवात होते. पुढे गोष्टीमध्ये येणारे अनेक चढउतार आणि एक वेगळ्या वळणावर कथेचा होणारा शेवट हे सर्व तुम्हाला कादंबरी संपल्यानंतरही विचारमग्न ठेवण्यासाठी पुरेसे आहे.

कादंबरी जरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीची असली तर समाजातील दरी जी तेव्हा होती तीच आजच्या तितकीच असल्याची दिसून येते. तेव्हा आपले सामाजिक भान जागृत करण्यासाठी आणि दुःखांचे अनेक डोंगर पार करुनही जगण्याची उमेद जिवंत ठेवणं शिकण्यासाठी प्रत्येकानं उल्का वाचावी असचं म्हणेन !

©️®️पार्थ भेंडेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

The Power of Your Subconscious Mind

The diary of a young girl

पहिले प्रेम