राऊ

 राऊ

                                                                               -ना.स.इनामदार


        अवध्या हिंदुस्थानावर राज्य करणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी भरलेलं होतं व कर्तृत्वानं भारलेल होत. मूलायम सूर आणि असामान्य सौंदर्याचा वारसा लाभलेल्या यवनी कलावंतीण मस्तानीवर पेशव्यांचा जीव जडला आणि संघर्षाचा वणवाच पेटला, आशी ही इतिहासात अजरामर ठरलेली विलक्षण भावकथा म्हणजे 'राऊ' !

          बाजीरावांना त्यांच्या जवळच्या दोनच व्यक्ती राऊ म्हणून हाक मारत असत. एक म्हणजे बाजीरावांनच्या मातोश्री बाई राधाबाई व दुसरी म्हणजे स्वयं मस्तानी. एवढे वर्ष संसार करत असणाऱ्या काशीबाईना जो हक्क कधी मिळू शकला नाही तो हक्क मात्र, मस्तानीला मिळाला.

        इनामदारांची ही रोमहर्षक ऐतिहासिक कादंबरी .कर्तृत्ववान बाजीराव पेशव्यांचं आयुष्य हे संघर्षानं आणि रोमांचक प्रसगांनी भारलेलं होतं, वयाच्या एकविसाव्या वर्षी ऐन तारुण्यात या माणसाच्या आयुष्यात असामान्य सौंदर्य लाभलेली यवनी कलवंतीण मस्तानीने प्रवेश केला. पेशव्यांवर मस्तानीचा व मस्तानीवर पेशव्यांचा जीव जडला आणि समाजाविरोधातला हा रोमहर्षक संघर्ष सूरू झाला. अनेक अंगवस्त्र ठेवण्यात भूषण मानण्याच्या त्या काळातही बाजीरावांनी मस्तानीवर उत्कट प्रेम केले, तेही कुटुंबाचा आणि समाजाचा विरोध पत्कुरून !

      एक वाचक म्हणून, 'राऊ' वाचताना अनेक गोष्टी आपल्या मनाला उमगतात. मस्तानी आणि बाजीरावाची प्रेमकहाणीला बाजीराव-मस्तानी असे नाव प्राप्त झाले होते. मस्तानी एक यवनी कलावंतीण आणि तिचा धर्म मुसलमान. बाजीराव कोकणातल्या भटांच्या कुळातले ! परंतु त्यांच्या प्रेमात धर्माचा विचार कधी आलाच नाही. बाजीरावांप्रमाणेच मस्तानीचा ही जीव बाजीरांवामध्ये अडकला होता, परंतु हे समाजाला मान्य नव्हते. राधाबाईना (बाजीरावांच्या मातोश्री), चिमाजी अप्पा (बाजीरावाचे बंधू) यांना व अवघ्या धर्मपीठाला मान्य नव्हते.

        बाजीराव धर्माने ब्राम्हण कुळातले. जशी जशी ही बाजीराव व मस्तानाची प्रेमकहाणी शनवारच्या हवेलीचा  उंबरठा  ओलांडून बाहेर पडली तशी तशी बाजीरावांची आणि धर्मपीठांची झुंज सुरु झाली. अवघ्या धर्मपीठाने बाजीरावांच्या विरोधात बहिष्कार केला. आपले कुटुंबिय व धर्मपीठ यांच्याशी बाजीराव एकटे झुंजत होते.

       बाजीराव मस्तानी यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र व्हायला लागली. परंतु या सगळ्यांमध्ये एका माणूस मात्र खूप घुसमटत गेला, त्या म्हणजे राऊंची धर्मपत्नी, पेशवीण काशीबाई बाजीराव बल्लाळ ! इतिहासाने त्यांच मन जाणून घेण्याची दखलही  घेतली नाही. त्यामुळेच बाजीराव मस्तानीच्या प्रेम कहाणीत मात्र काशीबाई इतिहासाच्या पानांमधून हरपल्या.

       अवघं चाळीस वर्षाचं आयुष्य लाभल राऊसाहेबांना .त्यामध्ये मस्तानीप्रमाणेच काशीबाईंनीही त्यांना भरभरुन साथ दिली. बाजीरावांनी त्या अमाप शोर्याने रणांगणामध्ये  कायम विजयच प्राप्त केला. आपल्या तल्लक बुद्धी, असामान्य शक्ती, आणि स्वराज्य आणि छत्रपतीवरची निष्ठा ढळू न देता त्यांनी मराठी सामाराज्याचा विस्तार केला. तलवारीच्या आणि मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावर अवघ्या दिल्लीत सुद्धा मराठ्यांची जरब बसवली.

        आज बाजीराव-मस्तानी एक अत्यंत रोमहर्षक भावकथा ठरली आहे. इनामदारांनी त्यांची उत्कट प्रेमकथा सोप्या आणि भावपूर्ण शब्दात मांडली आहे. त्याच बरोबर इनामदारांनी काशीबाईंच्या भूमिकेला पुरेपुर न्याय दिलाय. म्हणून माझ्यामते विविध भाव भावनांनी व प्रेमाने भारलेली 'राऊ' सर्वांनी नक्की वाचावी. आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास जाणून घेण्याची आवड असणार्‍या प्रत्येकाने ही कादंबरी आवर्जून वाचावी !

©️®️सायली भोसले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

रावण राजा राक्षसांचा

पहिले प्रेम