आतला आनंद

आतला आनंद

- शान्ता ज. शेळके

    शान्ता शेळके हे तसं सर्व मराठी वाचकांना ओळखीचं नाव. फिकट रंगातलं नक्षीदार लुगडं, डोक्यावरून कधीही न ढळणारा पदर, कपाळावर ठसठशीत कुंकू, मोठ्या फ्रेमचा चष्मा, आणि सदा प्रफुल्लित व्यक्तिमत्व. ललितलेखन, कविता, चित्रपट संगीत, अनुवाद, कादंबरी लेखन अश्या अनेक साहित्य प्रकारांत मुशाफिरी करून शान्ता ताई रमल्या ते कवितांमध्ये. माझी शान्ता ताईंशी ओळख झाली ती 'आतला आनंद' या पुस्तकामुळेच.

    जानेवारी ते डिसेंबर २००१ या काळात त्यांनी सकाळ वृत्तपत्रात 'दीपमाळ' या सदरात ५२ ललित लेख लिहिले, त्याचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. ५२ लेख म्हटल्यानंतर पुस्तक खूप लांबलचक असेल असा आपला गैरसमज होऊ शकतो पण शान्ता ताईंना गप्पा मारण्याची भारी हौस. या पुस्तकाच्या माध्यमातून त्या वाचकांशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यामुळे पुस्तक कधी संपते आपल्यालाच समजत नाही. 'एक झेन कथा', 'नात्याचा घट्ट पीळ', 'खिडक्या बंद की उघड्या ?" असे काही बोधपर लेख, तर 'पत्रे...प्रेमपत्रे', 'प्रेमातले डावे उजवे', 'हसू हरवले आहे का ?' असे काही नाजूक विषय त्या कसोशीने हाताळतात. हे लेख आपली वास्तवाशी गाठ घालून तर देतातच पण त्याचबरोबर त्यातले तरल भाव ही जपतात.

    सदरलेखनाची जबाबदारी स्वीकारल्यावर शान्ता ताईंना खरं आव्हान होतं ते प्रत्येक लेखासाठी नवीन विषय सुचण्याचं. जुनं नवं साहित्य, लहान मुले, त्यांनी पाळलेली मांजर, बहारदार निसर्ग, त्यांच्या गच्चीत नियमाने येणारे पक्षी, माहितीपट, अचानक भेटलेल्या एखाद्या व्यक्ती बरोबरील मुक्त संवाद हे सर्व काही त्यांना विषयांचा पुरवठा करी व त्या लिहीत राही.

    प्रत्येक लेखागणिक पुस्तक आणखीनंच रंगतदार होत जातं. हे पुस्तक आपल्याला कायम लक्षात राहतं ते साधे सोपे विषय आणि मोजक्या पण प्रभावी शब्दांतल्या वर्णनामुळे. हे लेख आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींतील आनंद घ्यायला शिकवतात. नवा दृष्टिकोन देऊ पाहतात. हे अत्यंत छोटं पण पुरेपूर आनंद देणारं पुस्तक आपण प्रत्येकाने एकदा नक्कीच वाचायला हवं आणि एकदा वाचल्या नंतर तुम्ही ते पुन्हा पुन्हा वाचाल हे नक्की.

- तन्मयी स. पाटील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

बाई, बायको, कॅलेंडर !

पहिले प्रेम